शरीरातील युरिक ॲसिड वाढल्यामुळे सांधेदुखी होते? 'हे' आहेत उपाय

शरीरातील युरिक ॲसिड वाढल्यामुळे सांधेदुखी होते? हे आहेत उपाय

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

पायामध्ये विशेषतः अंगठ्याजवळ किंवा घोट्याजवळ अचानक वेदना सुरू होऊन तुम्हाला पाय हलवणंही कठीण होतं का?

त्या भागाचा दाह होऊन सूज येणं, त्वचा लाल, गरम होणं अशी लक्षणं तुम्हाला दिसतात का?

या अशाच असह्य वेदना पुढे चार ते पाच दिवस राहात असतील तर तुम्ही डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे.

शरीरामध्ये युरिक ॲसिड वाढल्यामुळे अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो.

या वेदनांचं मूळ शोधण्यासाठी रक्तातील युरिक ॲसिडची पातळी तपासणं गरजेचं असतं.

शरीरातील युरिक ॲसिड वाढल्यामुळे सांधेदुखी होते? हे आहेत उपाय

फोटो स्रोत, Getty Images

आपल्या शरीरात तयार होणारं युरिक ॲसिड आपलं मूत्रपिंड (किडनी) शरीराबाहेर लघवीच्या माध्यमातून फेकत असते.

मात्र किडनीमधील काही बदलांमुळे किंवा शरीरात युरिक ॲसिडचं प्रमाणच वाढल्यामुळे रक्तातील युरिकची पातळी वाढते.

हे वाढलेलं युरिक ॲसिडच या त्रासासाठी कारणीभूत असतं. युरिक ॲसिडचे स्फटिक पायाच्या, हाताच्या हाडांजवळ, सांध्यांमध्ये साचल्यामुळे वेदना होऊ लागतात.

त्यामुळे सूज येते आणि वेदनादायक दाह होऊ लागतो. या आजाराला गाऊट असंही म्हणतात.

अशा वेदना अचानक येण्याला आणि त्या काही काळ राहाण्याला गाऊट ॲटॅक असं म्हणतात.

गाऊट ॲटॅक येण्याची कारणं काय असू शकतात?

  • तुम्हाला भरपूर ताप येईल असं आजारपण आलं असेल तर
  • तुम्ही भरपूर दारू प्यायला असाल किंवा एकदम तेलकट, चरबीयुक्त जेवण केलं असेल तर
  • शरीरातलं पाणी कमी झालं असेल तर
  • सांध्याला दुखापत झाली असेल तर
  • काही विशिष्ट प्रकारची औषधं तुम्ही घेत असाल तर

अशा स्थितीत तुम्हाला डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. त्यांच्या सल्ल्याने पुढचे उपचार आणि जीवनशैली बदल करावे लागतील.

त्यांच्या सल्ल्यानेच या आजाराचं निदान आणि उपचार करणं अत्यंत आवश्यक आहे.

युरिक ॲसिड वाढण्याची, गाऊटची कारणं?

युरिक ॲसिड वाढण्याच्या कारणांबद्दल युनायटेड किंग्डमच्या नॅशनल हेल्थ सर्विसने काही कारणं दिली आहेत. एनएचएसने काही निरिक्षणं आणि कारणं नोंदवली आहेत.

ती पुढीलप्रमाणे-

  • काही वेळेस गाऊट एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाऊ शकतो. (अनुवंशिकता)
  • हा आजार बहुतेकवेळा पुरुषांमध्ये आढळतो, ते ही वय वाढल्यानंतर.
  • जर तुमचे वजन जास्त असेल तर गाऊटचा त्रास संभवतो
  • तुम्ही दारू पित असाल तर
  • मेनोपॉझचा काळ सुरू असेल तर
  • वॉटर टॅबलेट्स, उच्च रक्तदाबावरील औषधं सुरू असतील तर
  • कोलेस्ट्रॉलचं वाढलेलं प्रमाण, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचे विकार, ओस्टिओआर्थरायटिस किंवा डायबेटिस असेल तर
  • एखादी दुखापत किंवा शस्त्रक्रिया झाली असेल तर गाऊटचा त्रास संभवतो असं एनएचएस सांगतं.
  • गाऊट पुन्हापुन्हा येण्याची शक्यता असते. जर त्यावर उपचार केले नाही तर तो वारंवार परत येऊ शकतो.
शरीरातील युरिक ॲसिड वाढल्यामुळे सांधेदुखी होते? हे आहेत उपाय

फोटो स्रोत, Getty Images

वारंवार गाऊट ॲटॅक्स येत असतील तर युरिक ॲसिड कमी करण्यासाठी औषधं घ्यावी लागतात. जरी लक्षणं दिसत नसली तरी युरिक ॲसिड कमी करणारी औषधं नियमित घ्यावी असं एनएचएस सुचवतं.

गाऊट ॲटॅक परत येऊ नये, यासाठी काय करावं लागेल?

युरिक ॲसिडचं प्रमाण कमी करण्यासाठी एनएचएसने काही उपाय सुचवले आहेत.

  • एनएचएसच्या सांगण्यानुसार रुग्णाने वजन कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे परंतु त्यासाठी क्रॅश डाएट करू नये.
  • युरिक ॲसिड कमी करण्यासाठी चांगला चौरस आहार घेण्याची गरज आहे, त्यात कोणते पदार्थ खावेत, कोणते टाळावेत हे डॉक्टरांना विचारुन घ्यावे.
  • दारू पिणे थांबवले पाहिजे.
  • भरपूर पाणी तसेच द्रवपदार्थ घेतले पाहिजेत.
  • धूम्रपान बंद करं गरजेचं आहे.
  • नियमित व्यायाम (पण सांध्यांवर ताण येईल असा नव्हे) करणं आवश्यक.

गाऊट ॲटॅकच्या परिस्थितीमध्ये तात्काळ काय करता येईल यावर डॉ. तेजस खानोलकर यांनी बीबीसी मराठीला माहिती दिली.

ते म्हणाले, "गाऊटच्या तीव्र वेदना कमी करण्यासाठी, सूज कमी करण्यासाठी वैद्यकीय उपचारांचीच गरज असते. तोपर्यंत क्रायोथेरेपी अर्थात बर्फने 10 मिनिटे शेकल्यास दुखणे कमी होण्यास बरीच मदत होते.

डॉ. तेजस खानोलकर सांगतात, "दुखणे कमी झाल्यानंतर संध्याची हालचाल पूर्ववत होण्यासाठी हालचालीचे आणि सांध्याच्या भोवतालच्या स्नायूची ताकद वाढीचे व्यायाम फिजिओ तुम्हाला देतात. Acute phase मध्ये फिजिओ पेशन्टला काही splints देऊ शकतात ज्यामुळे दुखणाऱ्या भागाची कमीत कमी हालचाल होऊन त्याला थोडा आराम मिळू शकतो. भविष्यकाळात हा त्रास पुन्हा पुन्हा होऊ नये ह्यासाठी आहार आणि जीवनशैली बदलणे तसेच अतिरिक्त वजन कमी करणे फायद्याचे ठरते."

वजन कमी करणं का आवश्यक आहे?

बहुतांश डॉक्टर्स गाऊट, युरिक ॲसिडचा धोका कमी करण्यासाठी बहुतांशवेळा वजन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. मोठं वजनदार शरीर जास्त प्रमाणात युरिक अॅसिड तयार करत त्याचा ताण किडनीवर येत असतो.

त्यामुळे अतिरिक्त युरिक ॲसिड शरीरात साचू लागते. मात्र क्रॅश डाएट किंवा कोणत्याही शॉर्टकटने कमी केल्यास त्याचा जास्त त्रास होऊ शकतो.

वजन कमी करणं का आवश्यक आहे?

फोटो स्रोत, Getty Images

युके गाऊट सोसायटीही अशा प्रकारे अचानक वजन कमी करण्याला विरोध करते. या संस्थेने सुचवलेल्या माहितीनुसार वजन कमी करण्यासाठी बराच काळ उपाशी राहाण्याने युरिक असिडची पातळी वाढू शकते, त्यामुळे गाऊट ॲटॅकही येऊ शकतात. पण वजन कमी करणं अत्यंत आवश्यक असल्याचं ही संस्था सुचवते.

हॉर्वर्ड मेडिकल स्कूल येथे गाऊट एक्सपर्ट आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे डॉ. ह्योन चोई युरिक असिडची पातळी कमी करण्यासाठी भरपूर फळं, भाज्या, सुकामेवा, पूर्ण धान्यं खाण्याची सूचना करतात. तसेच सोडीयम, मासे, साखर कमी करण्याचा सल्ला देतात.

त्यांनी साधारणतः 26 वर्षे 44,000 पुरुषांच्या खाण्याच्या सवयींचा अभ्यास केला. त्यात ज्या लोकांनी अशा प्रकारचा आहार घेतला होता त्यांच्यामध्ये गाऊट होण्याची शक्यता कमी दिसून आली होती. अशा आहाराबरोबर नियमित व्यायाम आणि वजन कमी करण्यावरही डॉ. चोई भर देतात.

कोणते पदार्थ टाळावेत?

प्युरिन या पदार्थापासून युरिक ॲसिडची निर्मिती होत असते. त्यामुळेच प्युरिनचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ कमी खावेत असा सल्ला दिला जातो.

युके गाऊट सोसायटीने दिलेल्या सूचनांनुसार मांस, मासे, समुद्रातील जीव, यीस्ट घातलेले पदार्थ-पेयं, दारू, चिकन, द्वीदल धान्यं यामध्ये प्युरिनचे प्रमाण अधिक असते, दूध, चीज, दही, लोणी, अंडी, फळं- भाज्या यांमध्ये प्युरिनचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे प्युरिनचं प्रमाण कमी असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.

भरपूर साखर असलेली पेयं, दारू टाळण्याचा सल्ला दिला जातो. युके गाऊट सोसायटी तसेच डॉक्टर्स युरिक ॲसिड कमी करण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात.

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.

आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.