'खालिद का शिवाजी' का असू शकत नाही? सिनेमाचं प्रदर्शन एक महिना लांबणीवर, नेमका वाद काय?

खालिद का शिवाजी

फोटो स्रोत, Raj More/Khalid ka shivaji

    • Author, अमृता कदम
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

'असं हिंदू-मुसलमान काही नसतं'

'मग तुम्ही तसं का नाही सांगितलं वर्गात…तुम्ही तर आतडं-कोथळ्याचंच सांगितलं.'

'शिवाजी महाराज आपले होते की त्यांचे?'

'वेलांटी चुकली म्हणजे इतिहास बदलतो का ?'

लाल रेष

'खालिद का शिवाजी' या सिनेमाच्या ट्रेलरमधली ही वाक्यं…

खालिद नावाचा शाळेत शिकणारा मुलगा शिवाजी महाराजांना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. ते समजून घेताना त्याच्या आजूबाजूचे सामाजिक-सांस्कृतिक संदर्भही उलगडत जातात.

नुकत्याच पार पडलेल्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या 'मार्शे दु फिल्म' (Marché du Film) या विभागासाठी 'खालिद का शिवाजी' या चित्रपटाची निवड झाली होती.

या सिनेमाची सध्या चर्चा सुरू आहे.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

फेस्टिव्हलमध्ये झालेल्या निवडीमुळे किंवा त्याबद्दलच्या कौतुकासाठी ही चर्चा सुरू नाहीये. ही चर्चा सुरू आहे ती सिनेमाच्या ट्रेलरवरून काही हिंदू संघटनांनी केलेल्या विरोधामुळे.

मंगळवारी (5 ऑगस्ट) मुंबईत महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर दोन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. 'खालिद का शिवाजी' या सिनेमावर बंदी घालावी, अशी त्यांनी मागणी केली.

हिंदू संघटनांकडून बंदीची मागणी झाल्यानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्य़मंत्री आशिष शेलार यांनी सेन्सॉरकडे पुनर्विचाराची विनंती करू असं म्हटलं होतं.

आता या सिनेमाच्या प्रदर्शनाला एक महिना स्थगिती देण्यात आली आहे. 'खालिद का शिवाजी' या चित्रपटाचं प्रदर्शन 8 ऑगस्ट रोजी होणार होतं. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याकडून पुन्हा एकदा चित्रपटाचे परीक्षण करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी याबाबत ट्विट करून म्हटलं आहे की, 'खालिद का शिवाजी' चं प्रदर्शन माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांनी एक महिन्यासाठी स्थगित केले आहे. हे स्थगन महाराष्ट्र सरकारकडून चित्रपटातील ऐतिहासिक चुकीबाबत आणि सार्वजनिक सुव्यवस्थेवर होऊ शकणाऱ्या संभाव्य परिणामाबाबत व्यक्त केलेल्या चिंता लक्षात घेऊन करण्यात आले आहे.

खालिद का शिवाजी

फोटो स्रोत, RajMore

खरंतर अगदी नावापासूनच काही हिंदू संघटनांचा सिनेमाला विरोध आहे. आणि चित्रपटाचे दिग्दर्शक राज मोरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे उत्तर दिलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे, हे आपण पाहणारच आहोत.

पण या विरोधामुळे काही प्रश्नही उपस्थित होत आहेत. सिनेमाच्या नावालाच आक्षेप घेणाऱ्यांना शिवाजी हा खालिदचाही असू शकतो हेच मान्य नाही का?

असे आक्षेप घेऊन आपण शिवाजी महाराजांना एका विशिष्ट चौकटीत बांधू पाहात आहेत का? किंबहुना आपण जी त्यांची वर्षानुवर्षे एक प्रतिमा पाहात आहोत तीच बदलून त्यांना 'हिंदुत्ववादी राजा' अशा नवीन प्रतिमेत बांधत आहेत का?

याच प्रश्नांची उत्तरं सिनेमा आणि इतिहास या दोन्हीच्या अनुषंगाने शोधण्याचा हा प्रयत्न आहे.

'खालिद का शिवाजी' सिनेमामध्ये काय आहे?

चित्रपटाचे दिग्दर्शक राज मोरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना या चित्रपटाबाबत म्हटलं होतं, की पाचवीत शिकणाऱ्या खालिद नावाच्या मुसलमान मुलाची ही गोष्ट आहे.

खालिदला त्याच्या धर्मावरून त्याचे वर्गमित्र सतत चिडवत असतात. यानंतर खालिदच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात. त्याच्या बालसुलभ बुद्धीला मला याच नावावरून का चिडवलं जातं? शिवाजी नेमका कोण? असे प्रश्न पडू लागतात.

खालिदला पडलेले प्रश्न तो केवळ स्वतःजवळ ठेवत नाही. त्याच्या सभोवारात, त्याच्या कुटुंबात तो या प्रश्नांची उत्तरं शोधू लागतो.

'खालिद का शिवाजी' हा चित्रपट कैलास वाघमारे यांनी लिहिलाय, तर त्यातले संवाद 'शिवाजी अंडर ग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या सुप्रसिद्ध नाटकाचे लेखक राजकुमार तांगडे यांनी लिहिलेले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांना वर्तमानाच्या चष्म्यातून बघण्याचा प्रयत्न आम्ही केला असल्याचं राजकुमार तांगडे यांनी सांगितलं होतं.

"सध्या समाजातील धार्मिक विद्वेषाच्या वातावरणात कुठेतरी बंधुभावाची फुंकर घालावी आणि शाळकरी मुलाच्या भाबड्या भाषेत समाजाला शिवाजी समजावून सांगावा म्हणून हा चित्रपट आम्ही बनवला," असं तांगडे म्हटलं होतं.

सिनेमावर आक्षेप काय?

हिंदू महासंघाने या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरू असून त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात पत्र लिहून त्यांनी आक्षेप उपस्थित केले आहेत.

हिंदू महासंघाचे पत्र

त्यांतील एक आक्षेप म्हणजे सिनेमाच्या ट्रेलरमध्ये असलेलं शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मुस्लिम सैनिकांचा उल्लेख.

रायगडवरील मशिदीचा उल्लेख, इतिहासाचे विकृतीकरण या मुद्दायांवरही चित्रपटावर आक्षेप घेण्यात आला.

या आक्षेपांवर टीमची काय भूमिका?

चित्रपटाबद्दल घेण्यात आलेल्या आक्षेपांवर 'खालिद का शिवाजी'चे दिग्दर्शक राज मोरे, लेखक व अभिनेता कैलास वाघमारे, संवाद लेखक राजकुमार तांगडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आक्षेप आणि 'खालिद का शिवाजी' या नावावर घेण्यात आलेल्या आक्षेपांना उत्तर दिलं आहे.

शिवाजी खालिदचा कसा असेल? या मुद्द्यावर प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, शिवाजी महाराज कोणाचे, ज्याला कळले त्याचे असा चित्रपटात एक संवाद आहे.

जगभरातील प्रत्येकाला महाराज समजून घेण्याचा, त्यांना आदर्श मानण्याचा अधिकार आहे. चित्रपटाची मांडणी करताना एक मुस्लिम मुलगा महाराजांविषयी नेमका कशा पद्धतीने विचार करतो, या कथाबीजाभोवती हा चित्रपट असल्याने ज्याला इतर कशाहीपेक्षा माणुसकी श्रेष्ठ वाटते अशा प्रत्येकाचे महाराज असतील हा विचार चित्रपटात देण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35 टक्के मुसलमान होते आणि त्यांचे 11 अंगरक्षक हे मुस्लिम समाजाचे होते असा उल्लेख सिनेमाच्या ट्रेलरमध्ये होता. त्यावर आक्षेप घेण्यात आला.

ग्राफिक्स

ही संख्या ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे नाही, हे खालिद का शिवाजीच्या टीमने मान्य केलं आहे. पण शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते असं म्हणणंही अनैतिहासिक असेल असंही त्यांनी म्हटलं. महाराजांच्या सैन्यात दौलत खान, सिद्दी हिलाल, मदारी मेहतर असे मुस्लिम होतेच.

चित्रपट इतिहासाचे विकृतीकरण करतो या आक्षेपाला उत्तर देताना हा चित्रपट मुळातच ऐतिहासिक नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हा चित्रपट खालिद नावाच्या मुलाचा शिवाजी महाराजांना समजून घेण्याचा प्रवास आहे. जो चित्रपट ऐतिहासिक नाही तो इतिहासाचं विकृतीकरण करू शकत नाही.

चित्रपटाच्या टीमला महाराज हे माणुसकी जपणारे, उच्च-शूद्र असा भेद न मानणारे जनकल्याणाचा विचार देणारे रयतेचे कुळवाडीभूषण राजे होते असा विश्वास आहे.

महाराजांच्या याच गुणांना एका गोष्टीनुरुप प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न आहे चित्रपटामुळे मनोरंजन व्हावं, कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही वादात असलेले संवाद काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असंही या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

'हेतू चांगला असेल तर आक्षेप घेण्यासारखं काही नाही'

चित्रपटाच्या टीमने जरी वादात असलेले संवाद काढून टाकणार असल्याचं म्हटलं असलं तरी मुळात केवळ सिनेमाचा ट्रेलर पाहून त्यावर बंदीची मागणी करणं, सेन्सॉरने एकदा सर्टिफिकेट दिल्यानंतर पुनर्विचाराची भूमिका घेणं, हे कितपत योग्य आहे, यातून कोणता पायंडा पाडत आहोत असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

त्याबद्दल बोलताना लेखक-दिग्दर्शक आणि समीक्षक गणेश मतकरी यांनी म्हटलं की, मुळात चित्रपटाचा हेतू जर चांगला असेल तर त्यावर आक्षेप घेण्यासारखं मला काही वाटत नाही.

अशाप्रकारच्या विरोधातून ऐतिहासिक चित्रपट करताना केवळ आपल्या सोयीचा इतिहास मांडण्याचा आग्रह दिसतो का? या मुद्द्यावर बोलताना मतकरी यांनी म्हटलं की, "हा सिनेमा ऐतिहासिक सिनेमा नाही, कारण त्यातला मुद्दा आणि पार्श्वभूमी सामाजिक आहे.

सोयीचा इतिहास मांडणं हा मुद्दा तेव्हा येतो जेव्हा तुम्ही खरंच इतिहासातल्या घटना दाखवता. हा मुद्दा पद्मावतसारख्या सिनेमांना लागू होऊ शकतो. कारण त्यात महाकाव्यामधून लोकप्रिय झालेल्या कथेवर आधारीत फिल्म आणि त्यातून घडवलेलं इतिहासाचं दर्शन होतं.

त्याला ट्रेलर पाहून विरोध झाला, पण पूर्ण सिनेमा पाहिल्यावर तोही मावळला. आपल्याकडे बाजीराव-मस्तानीसारखा सिनेमा होता. त्याबद्दल एकवेळ विचार होऊ शकला असता."

"पण खालिद का शिवाजी हा सिनेमा एका मुलाच्या डोळ्यांसमोर असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा एवढाच आहे. त्यादृष्टिने त्या मुलाला जे सांगितलं जातं ते आदरपूर्वकच सांगितलं जात आहे.

एक नायक असल्यासारखीच शिवाजी महाराजांची प्रतिमा त्याच्या डोळ्यांसमोर उभी केली जाते," असं ते पुढे सांगतात.

खालिद का शिवाजी

फोटो स्रोत, Raj More/Khalid ka shivaji

या सिनेमाला शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष राजा म्हणून दाखवण्यावरून, त्यांच्या सैन्यातील मुस्लिम सैनिकांवरूनही विरोध होत आहे.

गणेश मतकरी यांनी त्याबद्दल म्हटलं की, प्रत्यक्षात महाराजांच्या सैन्यात केवळ हिंदूंचा समावेश होता असं नाही, आणि धर्मनिरपेक्षता हा तर गुणच आहे. त्यामुळे तो गुण नाकारून महाराजांची केवळ हिंदुत्ववादी राजा अशी प्रतिमा करण्याचा हा प्रयत्न आहे का?

शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम किती टक्के होते, याच्या आकडेवारीबद्दल पुरावा मागणं ठीक आहे. कारण तो तथ्यांचा भाग आहे. ही तथ्यं चित्रपटकर्त्यांनी कशाच्या आधारावर घेतली याबद्दल त्यांना विचारणं हे ठीक आहे, आणि ते न पटल्यास त्याचा प्रतिवाद जरुर व्हावा.

पण सर्वधर्मसमभाव ही काही नकारात्मक गोष्ट नाहीये. त्यामुळे हिंदुत्ववादी राजाची सर्वधर्मसमभाव मानणारा अशी प्रतिमा कशी करता हा युक्तिवादच चुकीचा वाटतो, असं गणेश मतकरी यांनी म्हटलं.

'साकल्याने विचार आवश्यक'

सिनेमा ही कला आहे, अभिव्यक्तीचं माध्यम आहे. त्यामुळेच सिनेमाला सरसकट विरोध करण्यापेक्षा साकल्याने विचार करणं आवश्यक आहे, अशी भूमिकाही गणेश मतकरी मांडतात.

खालिद का शिवाजीमधील दृश्य

फोटो स्रोत, Raj More/Khalid ka shivaji

"चित्रपटाकडे कला म्हणून पाहताना वेगवेगळे दृष्टिकोन असतात. काही वेळा इतिहास हा वेगळ्या पद्धतीने सांगितला जाऊ शकतो. काही जागतिक चित्रपटांमध्ये युद्धांचे शेवटदेखील बदललेले दाखवले आहेत.

जेव्हा असे बदल केले जातात तेव्हा या चित्रपटांची काही एक भूमिका असते, ती लक्षात घेता यायला हवी. त्यामुळे तुम्हाला वेगळं लिहिण्याचं , वेगळे सिनेमे करण्याचं स्वातंत्र्य असायला हवं.

तुम्ही ज्यांना मानता, त्यांचा अपमान होत असेल तर विरोध करणं एकवेळ ठीक आहे. या चित्रपटात तसं काही होतंय का, हे फक्त ट्रेलरवरुन कसं कळू शकेल?

काही संवादात तांत्रिकदृष्ट्या गफलत वाटत असेल तर ते बदलण्याची मागणी ही समजून घेता येऊ शकेल. पण पूर्ण सिनेमावर आक्षेप घेणं योग्य वाटत नाही".

'महाराजांचं धोरण धर्मावर आधारित द्वेष करणारं नव्हतं'

सिनेमावरून सुरू असलेला आताचा वाद, ट्रेलर यापलिकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं धर्मासंबंधीचं धोरण नेमकं काय होतं याबद्दल इतिहासाच्या अभ्यासक श्रद्धा कुंभोजकर यांनी काही गोष्टी अधोरेखित केल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे चार शतकांपूर्वी हिंदू आणि मुस्लिम या ओळखीसोबतच दखनी आणि हिंदुस्थानी म्हणजे उत्तर भारतीय या ओळखीचा प्रभावही जगण्यावर होता.

दख्खन प्रदेशातील समाज आपल्या समस्या, संकटं आणि आकांक्षांचा विचार आपल्या विशिष्ट संस्कृतीनुसार करत असे.

धर्म ही बाबदेखील महत्त्वाची होती. राजकीय विरोध किंवा पाठिंब्याच्या संदर्भात धर्माचा विचारही केला जाई. पण त्याच्या सोबतीनं प्रादेशिक ओळखीचाही प्रभाव असे.

राज मोरे

फोटो स्रोत, Raj More

छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही सेवेत असलेल्या मालोजी घोरपडे यांना लिहिलेल्या पत्रात या विचाराचं प्रतिबिंब दिसतं.

आदिलशाही तख्तावर पूर्वीच्या दक्षिणी सुलतानाच्या जागी पठाण म्हणजे वायव्य हिंदुस्तानातून आलेल्या सुलतानाने बस्तान जमवलं. तेव्हा महाराजांनी असं म्हटलं होतं की "पठाण वळवला म्हणजे एका उपरि एक कुली दक्षिणियाची घरे बुडवील."

यावर उपाय शोधताना महाराजांनी आणि गोवळकोंड्याच्या कुतुबशहाने मिळून असा विचार केला की, "आपली पादशाही जितकी वाढवू ये तितकी वाढवणे, पठाणाची नेस्तनाबूद करणे, दक्षणची पादशाही आम्हां दक्षणियांच्या हातीं राहे तें करावे" (इतिहासमंजरी पृ. 98-99) त्यामुळे घोरपडेंनी आदिलशाही सेवा सोडून द्यावी असं महाराजांचं सांगणं होतं.

या उदाहरणावरून लक्षात येतं की या काळात महाराजांना दक्षिणी ओळख ही धर्मापेक्षा जास्त अधोरेखित करावी असं वाटत होतं.

एकूण पहाता महाराजांचं धोरण हे प्रादेशिक सत्तेचा समतोल राखणारं होतं आणि धर्मावर आधारित द्वेष करणारं नव्हतं हे स्पष्ट आहे, असं मत त्यांनी मांडलं.