लाईमलाईटपासून दूर राहणारा अक्षय खन्ना पुन्हा 'धुरंधर' बनून कसा परततो?

अक्षय खन्ना

फोटो स्रोत, Getty Images & Aditya Dhar/Instagram

    • Author, यासिर उस्मान
    • Role, चित्रपट इतिहास अभ्यासक, बीबीसी हिंदीसाठी

कोणत्याही मोठ्या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी एक अलिखित नियम असतो, तो म्हणजे प्रसिद्धी यंत्रणा आणि सोशल मीडिया चित्रपटाच्या नायकाचंच गुणगाण करणार.

नायक (हिरो) हाच चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. मात्र, कधीकधी हा नियम मोडला जातो. बॉलीवूडमधील नुकत्याच आलेल्या 'धुरंधर' चित्रपटाबद्दलही असेच घडत आहे.

धुरंधर'चा स्टार हिरो रणवीर सिंह असला, तरी चर्चा मात्र अक्षय खन्नाची आहे.

रहमान डाकूच्या रूपात तो पडद्यावर असा अवतरला की, प्रेक्षकांनी थिएटरमध्येच हिरो बदलून टाकला. ज्याच्याकडून स्पॉटलाइटची अपेक्षा नव्हती, त्यानेच सगळा शो आपल्या नावावर केला.

चित्रपटातील अक्षयचे सीन आणि विशेष करून त्याच्या डान्स स्टेप इतक्या व्हायरल झाल्या की, त्याच्या चर्चेने रणवीर सिंह, संजय दत्त आणि अर्जुन रामपालसारख्या स्टार्सचा झगमगाट फिक्का पडला.

ही गोष्ट आणखी रंजक बनते, कारण अक्षय खन्ना हा असा कलाकार आहे, जो प्रकाशझोतात राहणं जाणीवपूर्वक टाळतो.

ना सोशल मीडिया हँडल, ना प्रचारासाठी टीम, ना पार्टी, ना फोटो-ऑप्स. शांत, निवांत, स्वतःपुरता, तरीही त्याची चर्चा होते. हिच तर 'धुरंधर'ची खरी मजा आहे.

आजच्या काळात स्व-प्रचारालाच यशाची गुरुकिल्ली मानलं जातं, पण अक्षय खन्ना या सगळ्याच्या विरुद्ध कमी चित्रपट करणे पसंत करतो, लाईमलाईटपासून दूर राहतो आणि मुलाखतीही टाळतो.

दक्षिण मुंबईतील त्याच्या घरी एकटे राहणे त्याला फार आवडते. दिग्दर्शक करण जोहर यांनी एकदा मजेत म्हटले होते, "अक्षय खन्नाला एखाद्या वीकेंडला ऑस्कर मिळत असला, तरी तो फक्त यासाठी नकार देईल की तो वीकेंडला घराबाहेर पडत नाही."

अक्षय असाच आहे. झगमगाटापासून कोसो दूर. पण पडद्यावर आल्यावर मात्र सर्वांना मागे टाकतो.

'चांगल्या टीमशिवाय अभिनेता काहीच नसतो'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जुलै 2017 मध्ये मला अक्षय खन्नाची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तो त्याच्या एका चित्रपटच्या प्रमोशनसाठी आला होता. पण 'प्रमोशन' हा शब्द त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अजिबात जुळत नसल्याचे लगेच जाणवले. तो मीडियाशी बोलण्याच्या मूडमध्ये नव्हता.

त्याच्या डोळ्यांत थकवा होता आणि चेहऱ्यावर शांतता. 2 महिन्यांपूर्वीच त्याचे वडील विनोद खन्ना यांचे निधन झाले होते.

मी संभाषण सुरू करत विचारले, "तुझे चित्रपट एवढे उशिराने का येतात?"

तो शांत, गंभीर आवाजात म्हणाला, "काही पर्सनल इश्यूज होते. त्यामुळे चित्रपटांपासून दूर होतो. आणि चांगली स्क्रिप्ट मिळत नव्हती."

वाक्य अर्धवट राहिले. काही क्षणांनी त्यानं स्वतःच बोलायला सुरुवात केली. जणू स्वतःच्या मनाची कवाडं एकेक करून उघडत होता.

तो म्हणाला, "हे पाहा, अभिनेता असणं सोपं नाही. अभिनेता हा जगातील सर्वात जास्त परावलंबी आणि संवेदनशील कलाकार असतो. इतर कला जसे लेखन किंवा संगीत एकटा माणूस करू शकतो. पण अभिनेता एकटा काही करू शकत नाही."

"आम्हाला चांगले दिग्दर्शक, लेखक, कॅमेरामन आणि चांगले सहकलाकार हवेतच. अभिनेता म्हणून आमची अवस्था बरीच नाजूक असते. चांगल्या टीमशिवाय आपण काहीच नाही."

अक्षय खन्ना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अक्षय खन्ना

'धुरंधर' पाहिल्यावर हे किती खरे आहे ते दिसून येते. अक्षय तोच आहे. पण 'धुरंधर'मध्ये त्याचा रोल ज्या पद्धतीने लिहिला गेला आणि दिग्दर्शक आदित्य धर यांनी ज्या ताकदीने त्याला पडद्यावर दाखवले त्याने सगळा खेळच बदलून गेला.

त्या दिवशी मुलाखतीत अक्षय बहुतेक प्रश्नांना थोडक्यात उत्तर देत होता जणू बोलायलाच नको आहे. शेवटी मी त्याला त्याच्या वडिलांविषयी विचारले. त्यांना जाऊन फक्त 2 महिने झाले होते.

तो पुन्हा शांत झाला. काही वेळानंतर म्हणाला, "पाहा, अजून फार दिवस झालेले नाहीत आणि याचा माझ्यावर अजूनही खूप परिणाम आहे. मी काहीही बोलेल, तर इमोशनल होईन. म्हणून राहू देऊ."

स्पष्टवक्तेपणा

मुलाखत संपल्यावर मी विचारले की, माझ्या कोणत्या प्रश्नाने त्याला त्रास झाला का?

तो ताबडतोब म्हणाला, "नाही-नाही. फक्त… माझी बोलायची इच्छा नाही."

त्याच्या या स्पष्टवक्तेपणाने मी आश्चर्यचकित झालो. तो आपल्या मोठ्या चित्रपटांपैकी एक प्रमोट करण्यासाठी आला होता, पण स्वतःबद्दल मोठ्या गोष्टी बोलण्यात त्याला अजिबात रस नव्हता.

तो स्पष्ट म्हणाला होता की, चित्रपट चांगला असेल आणि अभिनय चांगला असेल तर लोकांना आवडेलच मग त्याने प्रमोशन करो अथवा न करो किंवा मग तो चित्रपटचा हिरो असो किंवा नसो.

अक्षय खन्नाचा हा आत्मविश्वास अनेक वर्षांनंतर 'धुरंधर'मध्ये खरा ठरला. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तो कुठेच दिसला नाही, पण सगळीकडे व्हायरल मात्र तोच झाला.

करिअरचा वेगळा प्रवास

सुमारे 28 वर्षांपूर्वी, जेव्हा विनोद खन्ना यांनी 'हिमालय पुत्र'मध्ये (1997) अक्षयला लॉन्च केले, तेव्हा कोणीच कल्पना केली नव्हती की, त्याचा प्रवास हा हिंदी सिनेमातील सर्वात वेगळ्या प्रवासांपैकी एक असेल.

अक्षयला 'सोलो हिरो' म्हणून यश मिळाले नाही. गंमतीची गोष्ट म्हणजे हेच त्याचे वडील विनोद खन्नांच्या बाबतीतही लागू होते. त्यांच्या लोकप्रिय ठरलेल्या बहुतेक चित्रपटांमध्ये दोन हिरो होते. अक्षयचे यशस्वी चित्रपटही दोन हिरो किंवा मल्टीस्टाररच ठरले.

अक्षय खन्ना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अक्षय खन्ना

'बॉर्डर'मध्ये पहिल्यांदा त्याच्या अभिनयातली वेगळी चुणूक दिसली. संवेदनशील, अंतर्मुख, खोल भावना असलेलं पात्र. पण 'कुदरत', 'डोली सजा के रखना', 'लावारिस', 'आ अब लौट चलें' असे हिरो-केंद्रित चित्रपट एकापाठोपाठ एक आपटले.

मोठ्या प्रकाशझोतात आला तो सुभाष घई यांच्या 'ताल'मधून. पण तिथेही अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय होतेच. अक्षयवरचा प्रकाशझोत कायम कुणाशीतरी वाटला जातो, असेच दिसत राहिले.

'जणू एखाद्या पियानोवादकाची बोटे कापली जावीत'

अक्षयच्या कारकिर्दीला सगळ्यात मोठा फटका त्याच्या फ्लॉप ठरलेल्या चित्रपटांपेक्षा त्याच्या केसगळतीनं बसला. भारतीय चित्रपटसृष्टीत हिरोची हेअरस्टाईल अत्यंत महत्वाची मानली जाते.

हिरोचे केस ही त्याची ओळख असते, त्याचे स्टाईल स्टेटमेंट असते. त्याच्या चाहत्यांना भुरळ घालणारी गोष्ट असते. पण हीच गोष्ट अक्षय गमावत होता.

'दिल चाहता है'मध्ये (2001) त्याला आधुनिक, स्टायलिश रूपात दाखवले. पण केस वेगाने निघून जात होते.

अनेक स्टार्स अशा वेळी हेअर ट्रान्सप्लांट करतात, पण अक्षयने तसे केले नाही.

बऱ्याच वर्षांनंतर मयंक शेखर यांच्या इंटरव्ह्यूमध्ये त्याने उघडपणे मान्य केलं की, केस जाणं हा त्यांच्या आयुष्यातला असा धक्का होता ज्याने त्याचा आत्मविश्वास पूर्णपणे डळमळून गेला. जणू एखाद्या पियानोवादकाची बोटे कापली गेली.

या प्रामाणिक कबुलीमध्ये त्या अभिनेत्याची खरी ओळख होती, ज्याने आपल्या केसगळीतबाबतच धडपडत बसण्याऐवजी आपल्या कॅरेक्टरमध्येच बेमालूमपणे मिसळून जाणे निवडले.

कमबॅकचे वर्ष

'दिल चाहता है'नंतर अक्षय अब्बास–मस्तान आणि प्रियदर्शन यांच्या चित्रपटांमध्ये दिसत राहिला. 'हंगामा', 'हमराज़', 'नकाब', 'रेस' अशा अनेक हिट्समध्ये.

लोकप्रियता मिळाली, पण तो कधीही 'एकमेव' हिरो नव्हता.

'गांधी माय फादर'मध्ये (2007) हरिलाल गांधीची भूमिका केली, पण चित्रपट चालला नाही.

कदाचित याच टप्प्यावर त्याला लक्षात आले की, एकट्या हिरोऐवजी दमदार सपोर्टिंग रोल्स करणं जास्त योग्य आहे.

अक्षय हा हिंदी सिनेमातील कदाचित एकमेव हिरो असावा जो जवळपास टक्कल पडलेल्या लूकमध्ये 'इत्तेफाक' आणि 'दृश्यम'सारख्या हिट चित्रपटांमध्ये झळकला.

या वर्षी दोन मोठ्या हिट चित्रपटांमध्ये तो झळकला. 'धुरंधर'ची चर्चा मोठी असली, तरी याच वर्षीच्या सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर 'छावा'मध्ये त्याने औरंगजेबच्या भूमिकेत उत्कृष्ट काम केले.

अक्षय खन्ना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अक्षय खन्ना

दोन हिट्समुळे 2025 हे अक्षय खन्नाच्या करिअरचे सर्वात खणखणीत पुनरागमनाचे वर्ष ठरले आहे.

अक्षय खन्नाच्या जबरदस्त कमबॅकबद्दल बोलताना मयंक शेखर म्हणतात, "अक्षयला अनेकदा 'अंडररेटेड' म्हटलं जातं. कारण प्रमुख नायक म्हणून त्याला कधीच ते स्थान मिळालं नाही ज्याचा तो खरा हक्कदार होता."

"बॉक्स ऑफिस हे थिएटर बिझनेसवर चालणारं अनिश्चित चढ-उतारांचं जग आहे. त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी स्क्रिप्ट, जी अक्षयसारख्या शांत, संयमी आणि गूढ अभिनयशैलीच्या अभिनेत्याला न्याय देईल. अशाच थोड्या चित्रपटांपैकी एक म्हणजे 'दिल चाहता है'. या चित्रपटाने त्याच्या या वैशिष्ट्याला नेमकी आणि सुंदर जागा दिली."

छावा' आणि 'धुरंधर'मधून एक गोष्ट अधिक ठळक होते. अ‍ॅक्शनच्या कोलाहलातही अक्षय खन्ना आपल्या शांत, वजनदार आणि अचूक स्क्रीन-प्रेझेन्सने लगेच लक्ष वेधून घेतो. त्याची मितभाषी, पण भावनांनी भरलेली अभिनयशैली त्याला गर्दीतही वेगळं स्थान देते.

यशाची परिभाषा

यशाची स्वतःची व्याख्या सांगताना अक्षय खन्नाने एका मुलाखतीत म्हटले होते, "समजा मी एक बिझनेसमन आहे आणि माझा 500 कोटींचा व्यवसाय आहे. पण मी रतन टाटा नाही, धीरूभाई अंबानी नाही किंवा अजीम प्रेमजी नाही तर याचा अर्थ मी यशस्वी नाही का?"

"मी शाहरुख खान नाही तोपर्यंत मी यशस्वी नाही का? मी यश बघितले आहे. आपल्या 120 कोटींच्या लोकसंख्येत 15–20 लोकांना चित्रपटांमध्ये काम करून हिरो होण्याची संधी मिळते. त्यापेक्षा जास्त काय पाहिजे? 16–17 वर्षे मला माझ्या अटींवर काम मिळाले."

स्वतःच्या प्रतिभेवर विश्वास ठेवणारा आणि शांतपणे फक्त आपल्या कामातून व्यक्त होणारा अक्षय खन्ना आपल्या कमबॅकमधून दाखवून देतो की गोंगाट नव्हे, तर तुमचे कामच सर्वदूर पोहोचते. तसेच कधी कधी सर्वात हळूवार वाटणारे पुनरागमनच सर्वात दमदार ठरते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)