राकेश मारिया यांनी शीना बोरा हत्या प्रकरणी नव्या वादाला तोंड फोडलंय

    • Author, मयांक भागवत
    • Role, मुक्त पत्रकार

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया, यांचं 'Let Me Say it Now' पुस्तक म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलासाठी कोणत्या भूकंपापेक्षा कमी नाही.

राकेश मारिया यांच्या या पुस्तकामुळे आलेल्या भूकंपाचे झटके मुंबई पोलीस आयुक्तालयालाच नाही, तर थेट मंत्रालयात बसण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे राकेश मारिया यांनी शीना बोरा खून प्रकरणाच्या तपासाच्या वादात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं केलंय.

तर तत्कालीन पोलीस सहआयुक्त देवेन भारती यांच्यावर शीना बोराचे सावत्र वडील पीटर मुखर्जी यांच्याबाबतची महत्त्वाची माहिती लपवल्याचा, तर मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर फडणवीसांना चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी सध्या यावर बोलायला नकार दिलाय. पण 2015 मध्ये मीडियाशी बोलताना "तपास अधिकाऱ्यांनी तपास करावा, पोलीस आयुक्तांचं काम देखरेख करणं आहे, जर मारिया अनेकदा खार पोलीस स्टेशनला गेले नसते तरी चाललं असतं," असं म्हटलं होतं. या प्रकरणी वाद टाळण्यासाठी त्यांची उचलबांगडी केली, असंही फडणवीस पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.

राकेश मारिया यांना महाराष्ट्र पोलीस दलात 'सुपरकॉप' म्हणून ओळखले जात. 1993 च्या मुंबई बॉम्ब स्फोटानंतर दाऊद इब्राहिमच्या अंडरवर्ल्ड साम्राज्याची कंबर मुंबई पोलिसांनी मोडून काढली. त्यात राकेश मारिया यांची मोलाची भूमिका होती. नंतर बाँबस्फोटांची मालिका घडवून आणणाऱ्या इंडियन मुजाहिद्दीनच्या आरोपींना अटक करण्याचं श्रेय राकेश मारिया आणि त्यांच्या टीमला जातं.

राकेश मारिया यांच्या या पुस्तकावरून सुरू झालेल्या वादाला किनार आहे शीना बोरा खून प्रकरणी अचानक सरकारकडून झालेल्या त्यांच्या बदलीची.

शीना बोरा खून प्रकरणी जातीने लक्ष घातल्या प्रकरणी 8 सप्टेंबर 2015 ला सरकारने राकेश मारिया यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून अचानक बदली केली. तेव्हापासूनच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारिया यांची तडकाफडकी बदली का केली, हा प्रश्न विचारला जात होता. राकेश मारियांसारख्या अधिकाऱ्याची अचानक झालेली बदली, हा मंत्रालयात आणि महाराष्ट्र पोलीस दलात मोठा चर्चेचा विषय बनला होता.

शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास पुढे सीबीआयकडे गेला आणि अजूनही या प्रकरणी आता कोर्टात सुनावणी सुरू आहे. आता राकेश मारिया यांच्या पुस्तकाने वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांमधील वादाला पुन्हा तोंड मोकळं करून दिलं आहे.

शीना बोरा हत्याकांड काय आहे?

ऑगस्ट 2015 मध्ये पोलीस इन्स्पेक्टर दिनेश कदम यांच्या नेतृत्वाखाली खार पोलिसांच्या टीमने अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी श्यामवर राय नावाच्या एका व्यक्तीला मुंबईतून अटक केली.

पोलीस चौकशीदरम्यान श्यामवर रायने पोलिसांना शीना बोरा हत्या प्रकरणाची माहिती दिली. शीना बोरा कोण होती? तिच्यासोबत काय झालं? हे ऐकून पोलिसांच्या चौकशीची दिशाच बदलली. शीना ही माध्यमसम्राज्ञी इंद्राणी मुखर्जींची मुलगी तर, पीटर मुखर्जींची सावत्र मुलगी होती.

शीना बोरा हत्या प्रकरण मुंबईतील सोशल सर्किटमधील एका उच्चभ्रू कुटुंबाशी जोडलेलं होतं. श्यामला अटक झाली त्यावेळी राकेश मारिया मुंबईचे पोलीस आयुक्त तर देवेन भारती कायदा आणि सुव्यवस्था पोलीस सहआयुक्त पदावर कार्यरत होते. तपासाची सूत्रं राकेश मारियांनी स्वतःच्या हाती घेतली.

श्यामवरने दिलेल्या माहितीच्या आधारे इंद्राणी मुखर्जींना अटक करण्यात आली. या दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्त म्हणून राकेश मारिया खार पोलीस स्टेशनमध्ये स्वत: जाऊन आरोपींची चौकशी करत होते. तपास अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. शीना बोरा खून प्रकरणी होणाऱ्या चौकशीवर राकेश मारिया यांचं बारीक लक्ष होतं.

खुनाच्या प्रकरणाच्या चौकशीवर मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांचं जातीने लक्ष का? या प्रकरणी मारिया स्वत: इतका रस का घेत आहेत, यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीमागे मारियांचा उद्देश काय, असे प्रश्नही विचारण्यात आले. राकेश मारिया यांचे पीटर मुखर्जी यांच्याशी संबंध आहेत, असा आरोपही करण्यात आला.

फडणवीस, जावेदांवर आरोप

काही प्रश्न उपस्थित झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारिया यांच्यासोबत चर्चा केली होती. मीडियाला दिलेल्या मुलाखतीत, मारिया यांना गुन्हेगारांची चौकशी करण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे ते या चौकशीत लक्ष घालत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं होतं.

इंद्राणीच्या अटकेनंतर पोलिसांनी शीनाचे सावत्र वडील पीटर मुखर्जी यांची चौकशी सुरू केली. पीटर मुखर्जींचा शीनाच्या हत्या प्रकरणाची काय संबंध आहे, याबाबत राकेश मारिया स्वत: खार पोलीस स्टेशनमध्ये पीटर मुखर्जी यांची चौकशी करत होते.

राकेश मारिया यांनी पुस्तकामध्ये दावा केलाय की त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं होतं की, पीटर मुखर्जी यांची चौकशी सुरू आहे. तसंच या खून प्रकरणाशी पीटरचा संबंध असल्याचा संशयही मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केला होता.

पण ही चौकशी सुरू असतानाच 8 सप्टेंबर 2015 ला त्यांची पोलीस आयुक्त पदावरून तडकाफडकी बदली करण्यात आली. आणि या बदलीमागे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असल्याचा आरोप मारियांनी केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती पुरवल्याचा त्यांचा आरोप आहे.

राकेश मारियांनी अहमद जावेदांवरही आरोप केलेत. मारिया यांची उचलबांगडी केल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदी जावेद यांची नेमणूक झाली होती.

राकेश मारिया पुस्तकात लिहितात:

"मी मुखर्जींना ओळखायचो, असा खोटा प्रचार त्यावेळी करण्यात आला. मी केलेल्या तपासाबद्दल संशय निर्माण करण्यात आला. मी तेव्हाही स्पष्टपणे सांगितलं होतं की मी त्यांना ओळखत नव्हतो. पण संशयाचं वातावरण कायम होतं.

"मी गेल्यानंतर एका आठवड्याने पुढे आलं की माझ्या जागी आलेले नवे पोलीस आयुक्त अहमद जावेद मुखर्जींना चांगल्याने ओळखत होते. जावेदांनी मुखर्जी जोडप्याला ईद पार्टीचंही निमंत्रण दिलं होतं. ही गोष्ट (तेव्हाचे) मुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) आणि गृहमंत्रालयाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना माहिती नव्हती का? मुखर्जींचा मित्र पोलीस आयुक्त म्हणून नेमल्यानंतरचे धोके मंत्रालयातल्या बड्या लोकांना दिसले नाहीत का?"

राकेश मारियांच्या या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी आम्ही अहमद जावेद यांच्याशी संपर्क साधला. पण त्यांनी अजून उत्तर दिलेलं नाही.

देवेन भारती आणि मारियांमध्ये वाद?

महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख देवेन भारती शीना बोरा हत्या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस सहआयुक्त होते.

राकेश मारिया आणि देवन भारती दोघांचही मुंबई पोलीस दलात मोठं नाव आहे. देवेन भारती यांनी राकेश मारियांच्या सोबत 2008 मुंबई हल्ला प्रकरणाच्या चौकशीत प्रमुख भूमिका बजावली होती.

मुंबईच्या गुन्हेगारी जगताची खडान् खडा माहिती असणाऱ्या या दोन्ही अधिकाऱ्यांनी काही वर्षं मुंबई क्राइम ब्रांचमध्ये एकत्र काम केलं आहे.

पण मारियांनी शीना बोरा प्रकरणी देवेन भारतींच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलं आहे. त्यांच्या पुस्तकानुसार शीनाचे सावत्र वडील पीटर मुखर्जींनी, शीना बेपत्ता झाल्यानंतर देवेन भारतींना याबाबत माहिती दिली होती.

मारिया आरोप करतात की तेव्हा देवेन भारतींनी ही गोष्ट मारिया यांच्यापासून लपवून ठेवली.

पण भारतींनी हे आरोप नाकारले आहेत. ते सध्या महाराष्ट्र पोलिसात दहशतवादविरोधी पथकाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आहेत.

राकेश मारियांच्या गौप्यस्फोटावर ते म्हणतात, "मारिया यांचे बॉलिवुडशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे त्यांच्यावर पटकथा लेखकांच्या संगतीचा चांगला प्रभाव झालेला दिसतोय. किंवा ते तथ्य मांडण्याऐवजी लोकांचं लक्ष वेधण्यासाठी ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आजमावत असतील. एका पोलीसवाल्याने तरी किमान आरोपपत्र आणि केस डायरी वाचायला हवी. हे प्रकरण कोर्टात आहे, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही, मात्र हे नक्की की मुंबई पोलिसांकडे हे प्रकरण तपासासाठी होतं, तोवर सगळ्यांनाच सारंकाही माहिती होतं."

मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आपापसात वाद आहेत, हे अनेक वेळा दिसून आलं आहे. आयपीएस अधिकाऱ्यांमधील शीतयुद्धाच्या बातम्या स्थानिक मीडियात अनेकदा चर्चेचा विषय ठरलाय.

त्यामुळे देवेन भारती यांच्यावर केलेल्या आरोपांमागे आयपीएस अधिकाऱ्यांमधील वाद आहे का? की यामागे राजकारण होतं? हे अप्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. मारियांच्या पुस्तकामुळे उत्तरं कमी आणि प्रश्न जास्त निर्माण होत आहेत.

(मयांक भागवत यांनी मुंबईत क्राईम रिपोर्टिंग केले आहे. त्यांनी शीना बोरा हत्याकांडाच्या तपासाचं वार्तांकन केलं होतं.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)