You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सौदी अरेबियात महिलांना अखेर ड्रायव्हिंगची परवानगी मिळणार
सौदी अरेबियात बदलाचे वारे वाहत आहेत. महिलांना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर आता त्यांना ड्रायव्हिंग सुद्धा करता येणार आहे. स्थानिक महिलांच्या लढ्याला अखेर यश आलं आहे.
सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी देशात महिलांना वाहन चालवण्याचा अधिकार देण्याचा आदेश जारी केला आहे.
या संदर्भात प्रशासन महिनाभरात अहवाल तयार करणार आहे आणि जून 2018 पासून या बदलाची अंमलबजावणी करण्यात येईल, असं सौदीच्या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
- सौदी अरेबियात बदलाचं वारं वाहत आहे का?
- 'महिला अर्ध्या डोक्याच्या असतात'?
महिलांना वाहन चालवण्याची परवानगी नसलेला सौदी अरेबिया हा जगातला एकमेव देश होता.
सौदीतील सध्याच्या व्यवस्थेनुसार पुरुषांना वाहन चालवण्याचा परवाना मिळतो. महिला वाहन चालवताना आढळल्यास त्यांना अटक होऊन दंड ठोठावण्यात येतो.
या नियमामुळे घरातील महिलांना बाहेर जाण्या-येण्याकरता कुटुंबीयांना खाजगी ड्रायव्हरची मदत घ्यावी लागत असे.
महिलांना वाहन चालवण्याचा अधिकार मिळावा, यासाठी सौदीतील उजव्या विचारसरणीच्या लोकांनी गेली अनेक वर्षं लढा दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवल्याप्रकरणी काही महिलांना तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.
निर्णयाचं स्वागत
वाहतुकीचे नियम, वाहन चालवण्याचा परवाना अशा विविध गोष्टींबाबतच्या नियमांची शाही राजघराण्यातर्फे अंमलबजावणी करण्यात येईल, असं वृत्तसंस्थेनं स्पष्ट केलं.
हा निर्णय ऐतिहासिक आहे, असं सौदीचे अमेरिकेतील राजदूत प्रिन्स खालीद बिन सलमान यांनी सांगितलं. योग्य वेळी योग्य निर्णय अशा शब्दांत त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
महिलांना वाहन परवान्यासाठी घरातील पुरुष मंडळींची परवानगी घेण्याची आता गरज नाही हे त्यांनी स्पष्ट केलं. देशभरात कुठेही वाहन चालवण्याचा अधिकार त्यांना देण्यात येणार आहे.
योग्य दिशेने टाकलेलं महत्त्वपूर्ण सकारात्मक पाऊल, अशा शब्दांत अमेरिकेने या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
सौदीमध्ये महिलांना वाहन चालवण्याचा अधिकार मिळावा, यासाठी लौजेन-अल-हथौल यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. बंदी असताना वाहन चालवल्याप्रकरणी त्यांना 73 दिवस ताब्यात घेण्यात आलं होतं.
कट्टरवाद्यांचा विरोध
वुमन टू ड्राइव्ह उपक्रमाच्या प्रवर्तक मनाल-अल-शरीफ यांना वाहन चालवल्याप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. देशातील महिलांच्या दृष्टीनं अत्यंत मोलाचा निर्णय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
"मला प्रचंड आनंद झाला आहे. नाचून, खिदळून मला हा आनंद व्यक्त करावासा वाटत आहे. मी माझ्या आवडीची गाडी खरेदी करणार आहे," असं चळवळ कार्यकर्त्या सहर नासिफ यांनी म्हटलं.
दरम्यान जगभरात या निर्णयाचं स्वागत होत असताना सौदीतील एका वर्गाने हा निर्णय शरियाच्या नियमांविरुद्ध आहे अशी टीका केली आहे.
शरियाच्या नियमांनुसार महिलांना वाहन चालवण्याची परवानगी नाही. अचानक हा नियम कसा बदलण्यात आला असे एका टीकाकारानं म्हटलं आहे.
सौदी अरेबियात महिलांवर कठोर निर्बंध आहेत. महिलांना विशिष्ट पोशाख परिधान करणे सक्तीचे आहे.
कुटुंब किंवा कामाशी संबंधित नसलेल्या पुरुषांशी बोलण्यास मनाई आहे. कामानिमित्ताने महिलांना प्रवास करायचा असेल तर पुरुष सहकारी बरोबर असणे अनिवार्य आहे. तसं नसेल तर घरातील पुरुष मंडळींची परवानगी आवश्यक आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)